पोलिसांची माफी माग, नाहीतर तुला...
खासदार नवनीत राणा यांच्यावर घणाघाती टीका करत त्यांच्यावर गुन्हा दाखल कारण्याची मागणी पोलीस पत्नी वर्षा भोयर यांनी केली आहे. यादरम्यान त्यांनी नवनीत राणा यांचा एकेरी उल्लेख करत इशारा दिला आहे. दोन दिवसात पोलिसांची माफी मागीतली नाही तर सोडणार नाही, असा इशारा वर्षा भोयर यांनी नवनीत यांना दिला आहे. त्यामुळे हा मुद्दा चांगलाच चिघळताना दिसत आहे. बीड जिल्ह्यातील एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी देखील नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण?
खासदार नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांशी हुज्जत घातली होती. एक तरुणी बेपत्ता झाली होती. कथित लव्ह जिहादमध्ये तिला फसवण्यात आलंय. तरुणावर कारवाई करण्यात यावी, यासाठी नवनीत राणा पोलीस स्टेशनमध्ये गेल्या होत्या. याठिकाणी त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. तर बेपत्ता तरुणी सातारा येथे मिळून आली. 'आईवडिलांशी वाद झाला होता. शिक्षण घेण्यासाठी मी घरातून रागाच्या भरात निघून गेले होते. मला कुणीही पळवून नेलं नाही आणि लग्नही केलं नाही. माझी बदनामी थांबवा. नवनीत राणांनी खोटी माहिती दिली आहे. लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून माझी बदनामी केली जात आहे", असा आरोप या तरुणीने केला आहे.
त्यानंतर विविध स्तरावरून नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी राणा यांच्यावर गुन्हा करावं अशी मागणी पोलीस बॉईज यांच्याकडून करण्यात आली आहे. लव्ह जिहादच्या नावाखाली बेताल वक्तव्य करत, सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न राणा यांनी केला आहे त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी बीडचे जिल्हाध्यक्ष शफिक शेख यांनी केली आहे.
वर्षा भोयर आक्रमक
पोलीस पत्नी वर्षा भोयर या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी एकेरी भाषेत उल्लेख करत नवनीत राणा यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. माफी मागितल्याशिवाय शांत बसणार नाही. मग मुंबईच नाही तर दिल्लीला जरी जावं लागलं तरी जाणार. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील जाणार असल्याचं भोयर म्हणाल्या.
काय म्हणाल्या वर्षा भोयर?
नवनीत राणा यांचा एकेरी उल्लेख करत पोलिसाची आंदोलक पत्नी म्हणाल्या की, “नवनीत राणा आता तू माफी माग, मला मुंबईला जावं लागलं तरी जाणार, मला दिल्लीला जावं लागलं तरी जाणार, पण हे प्रकरण आता थांबणार नाही. जोपर्यंत तू माफी मागणार नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. मी इथे बसून आमरण उपोषण करेन. तुला माफी मागावीच लागणार आहे. तू दहावी-बारावी पास झाली आहेस, इथे जे अधिकारी येतात…, ते यूपीएससी, एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी अहोरात्र जागरण करत मेहनत करतात.
तू देखील कोरोना काळात एका पोलीस अधिकाऱ्याचा ऑडिओ कॉल रेकॉर्ड करून व्हायरल केला होता. सर्वांना नियम सारखे असायला पाहिजेत, तिला कॉल रेकॉर्ड करून व्हायरल करण्याचा अधिकार कुणी दिला?” असा सवालही पोलिसाच्या आंदोलक पत्नीने उपस्थित केला.
“नवनीत राणा तुझा निषेध असो, पोलिसांची हाय तुला सुखाने जगू देणार नाही. तू त्यांची बदनामी केली आहे, मी आता गप्प बसणार नाही, तू काहीही बोलली तरी मला आता फरक पडणार नाही. पण तुझ्याविरोधात आता मी अविरतपणे लढणार आहे. तू फक्त नौटंकी आहेस, नौटंकीच राहशील आणि नौटंकीच करशील” अशी प्रतिक्रियाही पोलिसाच्या पत्नीने दिली आहे.