संतप्त विद्यार्थ्यांनी गाठले घुग्घुस बसस्थानक
महामंडळाच्या बसेस रोखण्याचा विजय पिदूरकर यांचा इशारा
चंद्रपूर : जिल्ह्यातील औद्योगिक नगरी घुग्घुस क्षेत्रातील ग्रामीण भागातील व वणी तालुक्यातील अनेक विद्यार्थी विद्यार्जनासाठी शाळा, कॉन्व्हेंट व महाविद्यालयात अनेक वर्षांपासून बस पास काढून येतात. परंतु वेळेवर बस येत नसल्याने बस पास धारक विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच बस पास असून सुद्धा पैसे देऊन खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.
गुरुवारी नायगाव व अनेक ग्रामीण भागातील पालक आणि विद्यार्थ्यांनी, भाजपा नेते विजय पिदूरकर व विवेक बोढे यांच्या नेतृत्वात घुग्घुस बसस्थानकावर धडक दिली.
घुग्घुस बसस्थानकाचे आगार प्रमुख यांना निवेदन देऊन चंद्रपूर आगार प्रमुख यांना भाजपा नेते विवेक बोढे यांनी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून क्षेत्रातील विद्यार्थ्यांना होणाऱ्या गंभीर असुविधेची जाणीव करून दिली तसेच तत्काळ विद्यार्थ्यांना होणाऱ्या असुविधा दूर करा नाही तर वणी तालुक्यातील बेलोरा पुला जवळ चंद्रपूर ते वणी येणाऱ्या महामंडळाच्या बसेस रोखण्यात येईल असा इशारा विजय पिदूरकर यांनी दिला.
महामंडळाच्या अधिकारी घोडमारे यांनी तत्काळ विद्यार्थ्यांना होणाऱ्या असुविधा दूर करण्याचे आश्वासन दिले.