बलेनो कारमध्ये आढळले पिस्तूल; दोघांना अटक
चंद्रपूर : एका चारचाकी वाहनात देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आल्याने माजरी येथील दोघांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई बुधवार, 28 डिसेंबर रोजी वरोरा येथील रत्नमाला चौकात केली.
बलेनो कार (एमएच 34, बीआर 8593) ही नागपूरकडून चंद्रपूरकडे येत असून त्या कारमध्ये देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वरोरा येथील रत्नमाला चौकात नाकेबंदी करून ही कार अडविली. कारची झडती घेतली असता त्यात एक देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी पुन्नमचंद येलय्या मारकरी (34, रा. चैतन्य कॉलनी, माजरी) आणि अभिलाष ओदेलू पंचल (30, रा. माजरी कॉलरी वॉर्ड क्रं. 5, माजरी) यांना अटक केली असून, त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार, देशी बनावटीचे पिस्तूल, दोन काडतूस, दोन भ्रमणध्वनी असा एकूण 5 लाख 26 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस अधीक्षक तथा वरोडा उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपाणी, सहायक पोलिस निरीक्षक राजकिरण मडावी, पोलिस हवालदार जुमडे, गुरनुले, अनिल बैठा यांनी केली.