चंद्रपूर : सामूहिक शेतीचे फेरफार करून वेगळा सातबारा तयार करण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना घोसरी येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी पोंभूर्णा येथून रंगेहात अटक केली. दिलीप रामचंद्र मोरे असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.

चंद्रपुरातील तुकूम परिसरातील सेवानिवृत्त कर्मचारी आणि अन्य दोघांनी मिळून पोंभूर्णा तालुक्यातील चकठाणा येथील सर्वे क्र. 99 क्षेत्र 4.58 हेक्टरपैकी 2.40 हेक्टर सामूहिक शेतीची जागा विकत घेतली होती. शेतजमिनीचे फेरफार करून वेगळा सातबारा व नकाशा दुरुस्ती करण्यासाठी तक्रारदारांनी तलाठी दिलीप मोरे यांच्याकडे अर्ज केला. मात्र, तलाठ्याने यासाठी तीन हजारांची मागणी केली. अखेर दोन हजार रुपये पोंभूर्णा येथील निवासस्थानी देण्याचे ठरले. परंतु, लाच द्यायची नसल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीवरून पथकाने सापळा रचून बुधवारी तलाठी दिलीप मोरे यांना राजराजेश्वर नगर पोंभूर्णा येथून रंगेहात अटक केली. ही कारवाई पोलिस उपायुक्त राहुल माकणकर, अपर पोलिस अधीक्षक मधुकर गिते. चंद्रपूरचे पोलिस उपअधीक्षक अविनाश भामणे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शीला भरदे, उपनिरीक्षक रमेश वाघमारे, रविकुमार दुपारे, नरेश सिद्राम यांनी केली. नन्नावरे, संदेश ढंगळे, सतीश सिद्रम यांनी केली.