चंद्रपूर : मूल शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर मूल-चंद्रपूर मार्गावर रानतलावाजवळ ट्रक-बसमध्ये भीषण अपघात झाला. ही घटना गुरूवार, 29 डिसेंबरला दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली. यात बसमध्ये मागच्या सीटवर बसलेली युवती जागीच ठार झाली असून, काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. तर, ट्रकचालक घटनास्थळावरून ट्रक ठेऊन फरार झाला.

तेजस्विनी नारायण कोडवते (24, रा. एकलपूर, ता. वडसा, जि. गडचिरोली) असे मृतक युवतीचे नाव आहे. बस (एमएच 40, वाय 5807) ही गडचिरोलीवरून चंद्रपूरकडे जात होती. तर ट्रक (सीजी 7 बीपी 4027) हा चंद्रपूरवरून मूलकडे भरधाव येत होता. ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने विरुध्द दिशेने येणार्‍या बसला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की युवतीचा डावा हात तुटून रस्त्यावर पडला. युवतीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून, ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

घटनेचा पुढील तपास मूल पोलिस ठाण्याचे ठाणेदार सतीशसिंह राजपूत करीत आहे. ही घटना ही मूल शहरापासून काही अंतरावर घडली. घटनेची माहिती मूल पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमी प्रवाशांना बाहेर काढले. याप्रसंगी नागरिकांनीसुद्धा जखमींना रुग्णालयात पोहचविण्यासठी मदत केली.