चिमूर (चंद्रपूर) : शहरातील गांधी वॉर्ड येथे संपत्तीच्या वादावरून रूपेश पत्रु नागोसे (वय 39) याने काका प्रभाकर धर्माजी नागोसे (वय 60) याला लाकडी स्टुलच्या दांड्याने डोक्यावर मारून ठार केल्याची घटना मंगळवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. डोक्याला गंभीर जखम होऊन रक्तस्त्राव झाल्याने त्याचा आज बुधवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला.

 धर्माजी नागोसे यांनी सहा मुलांत शेतीची बरोबर वाटणी केली. त्यापैकी स्वतःकडे एक हिस्सा ठेवला होता. प्रभाकर याने आई-वडीलांचा मरेपर्यंत सांभाळ केला. त्यामुळे वडीलाच्या मृत्यूनंतर त्यांचा हिस्सा स्वतः ठेवून घेतला होता. प्रभाकर नागोसे हा प्लॉट विक्रीचा व्यवसाय करुन दोन वर्षापुर्वी नवीन घर बांधले. मुलबाळ नसुनही धनसंपत्ती जमा करीत असल्याने बुट्टीबोरी येथे काम करीत असलेला आरोपी रूपेश हा काका प्रभाकर यांचा राग करीत होता. हाच राग मनात ठेऊन काकाचा वचपा काढण्याकरिता रूपेश हा बुट्टीबोरी येथून मंगळवारी चिमूरला आला. 

मात्र, त्यावेळेस काका प्रभाकर हा घरी नव्हता. त्यामुळे काकूसोबत भांडण केले. काही वेळात काका प्रभाकर घराकडे येताना दिसताच रूपेशने घरात शिरुन लाकडी स्टुल फरशीवर आदळून तोडला. चुलता घरी येण्यापुर्वीच रस्त्यावरच स्टुलच्या दांड्याने डोक्यावर वार केले. डोक्याला जबर दुखापत झाल्याने प्रभाकर रक्ताच्या थारोड्यात खाली कोसळला. ही घटना लपविण्याकरिता कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी काकूला दिली. त्यानंतर आरोपीने स्वतः उपचाराकरिता दवाखाण्यात नेले. गंभीर जखमी असल्याने रेफर करण्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रभाकार यांना कुठेही न नेता घरी परत आणले. मात्र, अतः रक्तस्त्राव व जखमा झाल्याने पुन्हा पहाटे 5 वाजताच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल केले. यावेळी डॉक्टरणी मृत घोषित केले. 

घटनेची माहिती चिमूर पोलिसांना देण्यात आली. मृताची पत्नी भीती पोटी कधी पती पडून जखमी झाला, तर कधी मारल्याचे सांगत होती. मात्र, जखमा बघून हत्या झाल्याचा निष्कर्ष डॉक्टरने लावला. यानंतर हत्येची घटना उघडकीस आली. मृत प्रभाकर यांची साळी रेखा दामोदर आदमने रा 1. सिंदेवाही यांचे तक्रारीवरून रूपेश नागोसे याला पोलिसांनी ताब्यात घेतले.