चंद्रपूर : गेल्या दोन दिवसापासून भद्रावती तालुक्यातील घोडपेठ जवळील ऊर्जाग्राम येथील वेकोलिच्या वणी क्षेत्रातील केंद्रीय कार्यशाळा परिसरात वाघाचे वावर होते. या वाघाला जेरबंद करण्यात चंद्रपूर येथील वन विभागाला बुधवार, 28 डिसेंबरला दुपारच्या सुमारास यश आले.

दरम्यान, वाघाचा बंदोबस्त झाल्याने येथील कर्मचारी व वसाहतीतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी हा पट्टेदार वाघ येथील कार्यशाळा परिसरात शिरला होता. या परिसरात झाडे, झुडपे व लपण्यासाठी पुरेशी जागा असल्याने त्याने तेथेच आपला मुक्काम ठोकला होता. परिसरात वाघ आल्याचे लक्षात येतात त्याची माहिती चंद्रपूर येथील वन विभागाला देण्यात आली होती. या वाघावर पाळत ठेवण्यासाठी वन विभागाने या परिसरात ट्रॅप कॅ मेरे लावले होते. 

वाघाच्या भीतीमुळे सावधगिरीचा उपाय म्हणून येथील कर्मचार्‍यांना दोन दिवसाची रजा देण्यात आली होती. या वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने परिसरात पिंजर्‍याचा सापळा लावला व त्यात आमिष ठेवण्यात आले. वाघाने या पिंजर्‍यात प्रवेश केला व त्यात तो अलगदपणे अडकला. वाघाच्या या बंदोबस्तामुळे या परिसरात दोन दिवसापासून असलेल्या थराराचा शेवट झाला.