जिल्हा प्रशासनाच्या उल्लेखनीय कार्याची मंत्रालयात दखल

बालकांच्या संरक्षणासाठी अस्तित्वात असलेल्या विविध कायद्यांची चंद्रपूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी तसेच बाल संगोपन योजनेसाठी घेतलेला पुढाकार यासाठी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांची नागपूर विभागातून उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून निवड करण्यात आली व त्यांना मुंबई येथे ‘बालस्नेही’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जिल्हाधिकारी श्री. गौडा यांच्या नेतृत्वात महिला व बालविकास विभागाने बाल विवाह प्रतिबंधक कायदा, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा, POCSA यासारख्या काय‌द्याची प्रभावी अंबलबजावणी करून बाल संगोपन योजनेसाठी अभिनव उपक्रम राबविले. त्यामुळे महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांच्यामार्फत जिल्हाधिकारी विनय गौडा यांची नागपूर विभागातून उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून ‘बालस्नेही’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
हा पुरस्कार वितरण समारंभ 3 मार्च रोजी मुंबई येथे पार पडला. यावेळी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मनिषा कायंदे, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा, आयोगाचे सदस्य प्रशांत नारनवरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागाने केलेल्या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी यांच्या सोबतच दीपक बानाईत यांना 'बालस्नेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी' हा वैयक्तिक पुरस्कार, बाल कल्याण समिती चंद्रपूर यांना 'बालस्नेही सीडब्ल्यूसी' पुरस्कार तसेच बाल संरक्षण कक्ष चंद्रपूर यांना 'बालस्नेही डीसीपीयू' पुरस्कार प्रदान करण्यात आला. अशाप्रकारे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या नेतृत्वात जिल्ह्याला चार बालस्नेही पुरस्कार मिळाले आहेत.
जिल्हा प्रशासनाची मंत्रालयात दखल : तीन दिवसांपूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांचा नुकताच मंत्रालयात सत्कार करण्यात आला होता. तर आता चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांना उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. एकप्रकारे चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या उल्लेखनीय कार्याची दखल मंत्रालय स्तरावर होत असून जिल्ह्यासाठी ही गौरवाची बाब आहे.